Monday, March 3, 2014

अनिसला पुणेरी ज्योतिषाचे आव्हानपुण्याच्या एका ज्योतिष्याने आता अंधश्रद्धा निर्मूलन समितीलाच आव्हान दिले आहे. त्याने म्हंटले आहे की अनिसने हवामान शास्त्र हे शास्त्र आहे हे सिद्ध करून दाखवावे. त्यासाठी तो खुद्द पावसाळ्यातील दहा तारखा आणि दहा ठिकाणे देणार आहे. त्या त्या ठिकाणी त्या-त्या दिवशी आकाशात ढग असतील की नाही, पाउस पडेल की नाही, विजा चमकतील की नाही, पाऊस पडला तर तो किती वाजता पडेल, तो किती मिलीमीटर पडेल हे अनिसने हवामान खात्याला विचारून सांगावे. त्यातील 10 टक्के अंदाज जरी खरे ठरले तरी तो ज्योतिषी हवामान शास्त्र हे शास्त्र आहे हे मानायला तयार आहे. बक्षीस म्हणून तो ज्योतिषी अनिसला आपली अर्धी मिशी आणि पूर्ण शेंडी द्यायला तयार आहे.

तसेच यात हवामान खात्याचे अंदाज खोटे ठरले तर वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये हवामान शास्त्र हा विषय शिकवला जातो त्यावर बंदी घालण्यात यावी अशीही मागणी त्या ज्योतिषाने केली आहे. त्यासाठी खुद्द अनिसनेच तशी मागणी करण्याची अट त्या ज्योतिषाने घातली आहे.

असे कळते की ज्योतिषाच्या या आव्हानाने अनिस भलतीच अडचणीत आली आहे. कारण याच प्रकारचे आव्हान अनिस ज्योतिषांना नेहमी देत असते. हे आव्हान स्वीकारले तर अनिसची नक्कीच फजिती होईल याची चांगलीच जाणीव त्या संघटनेच्या वरिष्ठ पदाधिका-यांना आहे. 

या संदर्भात आमच्या प्रतिनिधीने प्रसिद्ध न्युमरालॉजीस्ट महावीर सांगलीकर यांची प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले की मी ज्योतिषी नसलो तरी आणि माझा ज्योतिष शास्त्रावर विश्वास नसला तरी अनिसने उठसुठ ज्योतिष शास्त्र हे शास्त्र आहे की नाही यासाठी ज्योतिषांना बक्षिसाची लालूच दाखवून आव्हान देणे चुकीचे आहे. अनिसचे कार्यकर्ते लॉजिकल विचार करत नसतात हेच दिसून येते. ते ज्या प्रकारचे आव्हान इतरांना देतात तशाच प्रकारचे आव्हान त्यांना मिळाले हे बरेच झाले. एखादी गोष्ट ही शास्त्र आहे की नाही हे ठरवायचा अधिकार अनिसला नाही. आणि त्यांना तसे ठरवायाचेच असेल तर त्यांनी हवामान शास्त्र, वैद्यक वगैरे  बाबतीतही तोच नियम लावायला पाहिजे.    

Popular Posts

Follow by Email